Sunday, June 21, 2009

विवाह : समाधान की समस्या?

'हॅलो, रानड्यांचं घर का? तुमच्या मुलाच्या स्थळासंबंधी जरा बोलायचं होतं. माझी मुलगी एमकॉम बीएड आहे.' वय, उंची, रंग अशी सर्व माहिती दिल्यावर समोरून विचारना होते '...बाकी सगळं ठीक आहे, पण मुलीला पगार किती? नोकरी कुठे? नोकरी कायमस्वरूपी आहे की तात्पुरती? तुम्ही असं करा फोटो, पत्रिका, माहिती इमेल करा. आता आम्हाला इतकं सगळं बोलायला वेळ नाही. आमचा मुलगा पुढच्या आठवड्यात यूएसवरून येणार आहे. आम्ही सगळे त्याच गडबडीत आहोत.'

इमे ल करून फोटो, पत्रिका, माहिती पाठवली जाते. दोन दिवसांतच समोरून रिप्लाय येतो, 'आमच्या मुलाला महिन्याला दीड ते दोन लाख पगार मिळतो. त्या मानाने मुलीची इन्कम फारच कमी वाटते. शिवाय, आमचा मुलगा गोरापान आहे, तुमची मुलगी निमगोरी असल्याने आपला योग जुळेल असं वाटत नाही.'

हे असं चित्र आजही विवाहेच्छुक तरुण-तरुणींच्या घरात सर्रास दिसून येतं. लग्नाचा योग फक्त महिन्याचा पगार आणि रंगरुपावर अवलंबून असतो? शिक्षण, संस्कार, सवयी, कौटुंबिक पार्श्वभूमी यांना काहीच किंमत नाही? महिन्याला दीड ते दोन लाख कमावणं भारतासारख्या देशात पुरेसं होत नाही. होणाऱ्या बायकोने नोकरी केलीच पाहिजे. शिवाय, सुंदर, गोरी, सडपातळ, चष्मा नसणारी अशा अटी पूर्ण करणारीच मुलगी सगळ्या मुलांना बायको म्हणून हवी असते. हे पाहिल्यावर कळतच नाही, मुलांना नक्की लग्न कशासाठी करायचं असतं? यांना नक्की लग्न करायचंय की अफेअर?

आज लग्न जमवताना बहुतांशवेळी पुढील पद्धतीनेच सुरुवात होते :

रूप, पैसा, घराणे, सवयी चांगल्या वाईट, चारित्र्य, स्वभाव.

एखादं स्थळ आलं, की पहिलं महत्त्व दिले जाते ते रुपाला, मग पैसा आणि त्यानंतर घर पाहिलं जातं. काही जुजबी प्रश्न विचारले, काही सवयी आहेत का असं विचारलं की सर्वात शेवटी चारित्र्य, स्वभाव असा आहे हे विचारलं जातं.

नश्वर असणाऱ्या देह आणि अशाश्वत पैशाला एवढं महत्त्व? त्याच वेळी चारित्र्यवान, उत्तम संस्कारात घडलेल्या मनमिळावू स्वभावाला मात्र कवडीमोलाची किंमत?

लग्न म्हणजे दोन कुटुंबाचे मिलन आणि मुलामुलीचं आयुष्यभराचं नातं असेल, तर हा क्रम (१ ते ५) कितपत योग्य आहे? माझ्या मते, (१ ते ५) हा क्रम अफेअर करण्यासाठी चांगला आहे, पण लग्नाचा निर्णय घ्यायचा, तर हा क्रम अगदी उलटा म्हणजे ५ ते १ असा हवा. मुलामुलीचं चारित्र्य, स्वभाव, सवयी, घराणं, पैसा आणि रूप या क्रमानेच स्थळाची पारख करायला हवी.

विवाहेच्छुक प्रत्येकाने हा विचार करायला हवा, की पुढे ही व्यक्ती माझ्या होणाऱ्या मुलाची पालक आहे. हॅण्डसम, टॉल, स्मार्ट, रीच जोडीदार म्हणून प्रत्येकालाच हवा असतो. पण पुढील आयुष्यात माझ्या होणाऱ्या मुलाचे वडील म्हणून ती व्यक्ती किती केअरिंग आहे? एक जोडीदार म्हणून किती कमिटेड आहेत? आयुष्यभराच्या नात्यासाठी किती कॉन्फिडण्ट आहे?

हॅण्डसम, टॉल, स्मार्ट, रीच अशा निकषांपेक्षा कमिटेड, कॉन्फिडण्ट, केअरिंग हे निकष जास्त ग्राह्य धरावेत. असा विचार केला, की कोणत्या गोष्टींवर तडजोड करायची हे समजतं. मग, मुलीची उंची ५.५ नसली तरी चालते, वर्ण थोडा सावळा चालतो. बांधा सडपातळ नसला तरी चालतो. याचं कारण पुढे जाऊन ती माझ्या मुलाची होणारी आई आहे. ती संस्कारक्षम आहे.

खरं तर पारंपरिक पद्धतीने सुरू असणारी ही पद्धत म्हणजे भलत्या अपेक्षांमुळे अवास्तव मागण्या करणं. आपल्या अपेक्षांनुसार योग्य व्यक्ती मिळेपर्यंत वर्षानुवर्षं शोधकार्य सुरू राहतं आणि मनपसंत जोडीदार न मिळाल्याने नैराश्य येतं.

खेदजनक गोष्ट अशी, आजकालच्या मुलामुलींना समजावणारे पालक स्वत:ही याच क्रमात (१ ते ५) गुरफटलेले आढळतात. आपल्या मुलांना नक्की संसार करायचाय की वीकेण्ड एन्जॉय करायला पार्टनर पाहिजे हे कोडं यामुळे वाढतच जातं.

आज फॅमिली कोर्टात डायव्होर्स पीटिशनच्या ढीगच्या ढीग पाहायला मिळतात, त्याचं मूळ इथेच कुठेतरी असावं असं राहून राहून वाटतं. अशा वेळी देवाला दोष देऊन स्वत:च्या कर्माकडे कानाडोळा करणं कितपत योग्य आहे? देवाने निर्माण केलेल्या परिस्थितीचा योग्य तो वापर करणं हे शहाणपणाचे लक्षण आहे की ती परिस्थिती नियंत्रणाबाहेर घालवणं? आजची पिढी नक्कीच हुशार आहे, सुखवस्तू आहे, विविध कलागुणांनी युक्त आहे. तेव्हा जीवन खऱ्या अर्थाने जगण्यासाठी या सर्व गोष्टींचा सखोल विचार करून योग्य तो समंजसपणा दाखवला तर सगळ्यांचच आयुष्य सौख्यपूर्ण आणि समाधानकारक होईल यात शंकाच नाही.

2 comments:

  1. एवढं सुदर सगळ्या गोष्टींचा केलेला उहापोह खरंच खुप काही सांगुन जातो. आतापर्यंतचा मी या विषयावरचा वाचलेला एक चांगला लेख असं याच वर्णन मी करेन. नश्वर देह आणि अशाश्व्त पैसा यालाच आजकाल महत्त्व दिल जातं हेच मी सुद्धा पटवुन द्यायचा प्रयत्न केलेला आहे, पण तु जे पद्ध्तीने हे सारं मांडलेल आहे त्याचं मी नक्कीच कौतुक करेन. खुप आवडला लेख तुझा,असंच लिहीत जा.

    -अजय

    ReplyDelete